एका सर्वेक्षणानुसार जगभरात सुमारे २० लाख शेतकरी जैविक शेती करतात असे अनुमान आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात जैविक शेती केली जाते. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले असून रासायनिक खते व कीटकनाशकांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.
शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली. यानुसार रासायनिक व कीटकनाशकमुक्त अन्नधान्य उत्पादन वाढवून निर्यात करणे हा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करावा लागतो. त्यांच्याकडे जैविक शेती करण्यासाठी किमान ५० एकर शेतीक्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन वर्षांकरिता प्रती एकर २० हजार रुपये अनुदान दिले जाते. सदर रक्कम शेतकऱ्यांनी जैविक बीयाणे खरेदी पेरणी ते बाजारपेठेत शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी दिली जाते. तसेच देशाच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात जैविक शेती केली जाते, त्या भागात शेतकऱ्यांच्या समूहाला पाहणी व अभ्यास दौऱ्याकरिता पाठविण्याची तरतूद आहे.