ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - ' लहानपणापासून माझ्या मनात भारतीयांबद्दल द्वेष आहे, ७ डिसेंबर १९९७१ रोजी भारतीय विमानांनी माझ्या शाळेवर बॉम्बहल्ला केला होता, त्या हल्ल्यात शाळेतील अनेक करणा-या कर्मचा-यांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झालो' असा खुलासा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड व या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने उलटतपासणीदरम्यान केला.
या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी घेतली जात आहे. कालच्या साक्षीदरम्यान ' लष्करने बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न केला होता' असा गौप्यस्फोट गुरूवारी केल्यानंतर शुक्रवारीही त्याने अनेक खुलासे केले. आजच्या साक्षीदरम्यान त्याने या मुद्यांवर आणखी प्रकाश टाकतानाच लष्करमध्ये सहभागी होण्याचा त्याचा हेतूही स्पष्ट केले. भारतीयांविरोधत असलेल्या द्वेषामुळे आणि शाळेवरील बॉम्बहल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हमूनच आपण लष्करसारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी झालो असे त्याने सांगितले.
दरम्यान शिवसेनेसाठी अमेरिकेत कार्यक्रम करता यावा यासाठी मी राजाराम रेगेच्या संपर्कात होतो असे हेडलीने पुन्हा नमूद केले. 'बाळासाहेबांना या कार्यक्रमासाठी अमेरिकेत बोलवण्याचा विचार होता मात्र त्यांच्यावर हल्ला करण्याचा हेतू नव्हता, मी त्यांची कधीच भेट घेतली नाही वा त्यांच्याशी बोललो नाही' असेही त्याने स्पष्ट केले. ' बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसते असे रेगेने सांगितल्यानंतर कार्यक्रमासाठी त्यांचा मुलगा व इतर शिवसेना नेत्यांना आमंत्रित करण्याबाबत मी विचारणा केली होती, असेही हेडलीने नमूद केले.
उलटतपासणीदरम्यान काय म्हणाला हेडली?
- शिवसेनेकरिता निधी उभारण्यासाठी अमेरिकेत कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला होता.
- बाळासाहेब ठाकरेंना या कार्यक्रमासाठी अमेरिकेत बोलवण्याचा विचार होता मात्र त्यांच्यावर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. त्यासाठी मी राजाराम रेगेच्या संपर्कात होतो, या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मी कधीच बाळासाहेबांना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी बोललो नाही.
- बाळासाहेबांच वय झालं आहे, ते आजारी असतात असं राजाराम रेगेने सांगितल्यावर मी इतर शिवसेना नेत्यांना निमंत्रण देण्याचा विचार करत होतो.
- मी कोणत्या कारागृहात आहे ही माहिती देऊ शकत नाही, तसंच मला कोणत्या सुविधा मिळत आहेत तेदेखील सांगू शकत नाही. अमेरिकेतील कारागृहात मला सर्व सुख सुविधा मिळत आहेत ही माहिती चुकीची.
- लहानपणापासून माझ्या मनात भारतीयांविरोधात द्वेष आहे, 7 डिसेंबर 1971मध्ये भारतीय विमानांनी माझ्या शाळेवर बॉम्ब टाकून हल्ला केला होता ज्यामध्ये तेथे काम करणा-या कर्मचा-यांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्कर-ए -तोयबामध्ये सहभागी झालो.
- माझ्या वडिलांचा 25 डिसेंबर 2008 मध्ये मृत्यू झाला, त्यावेळी तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी सांत्वनासाठी आले होते.
- माझे वडील, भाऊ आणि काही नातेवाईकांचा पाकिस्तान निर्मितीत सहभाग होता, त्यांची माहिती मी उघड करत करु शकत नाही.
- मी लष्कर-ए-तोयबासोबत काम करत असल्याचं माझ्या वडिलांना सांगितलं होतं, माझ्या वडिलांनी याला विरोध दर्शवला होता.
- 9/11 दहशतवाही हल्ला प्रकरणी माझी कधीच चौकशी झालेली नाही. माझी पत्नी फैजाने तक्रार केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अटक झाली होती.
- NIA च्या सांगण्यावरून इशरत जहाँचे नाव घेतलं नव्हतं.
- न्यायालयात साक्ष देण्यापुर्वी मी सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांना भेटलो नाही.
- तहव्वूर राणावर अमेरिकेतील न्यायालयात खटला सुरु असताना मला इशरत जहाँसंबंधी प्रश्न विचारण्यात आले नव्हते, मला जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचीच उत्तर दिली.
- एनआयएने मला इशरत जहाँसंबंधी प्रश्न विचारले म्हणून मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली.
- अमेरिकेतील न्यायालयात मला इशरत जहाँसंबंधी विचारलं नव्हतं म्हणून मी नाही सांगितलं, मी प्रश्नांची उत्तर देत होतो, कोणतंही भाषण देत नव्हतो जिथे मी इशरतचं नाव घ्यायला हवं होतं.
- 1992 मध्ये माझ्यावर मानसिक उपचार करण्यात आले ही माहिती चुकीची, दुहेरी व्यक्तिमत्वाचा आजार मला होता हेदेखील खोटं आहे. मी कधीच पुनर्वसन केंद्रात गेलेलो नाही.
- मुंबईवर करण्यात येणारा हल्ला फसल्याची माहिती साजीद मीरने लाहोरमध्ये दिली होती.
- ज्या हेतूने मी इतर परिसरांची रेकी केली होती त्याच हेतून कुलाबामधील लष्कर परिसराची मी रेकी केली केली होती. मी कुलाबा पोलीस ठाण्याची रेकी कधीच केली नाही मात्र महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाची रेकी केली होती.
- 26/11 हल्ल्याअगोदर आण्विक प्रकल्पाला भेट दिली होती मात्र तेथे हल्ला करण्याची कोणतीही योजना नव्हती, तेथील एखाद्या व्यक्तीला लष्कर-ए-तोयबामध्ये भरती करता येऊ शकतं का याची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ही माहिती मी तहव्वूर राणाला दिली होती.
- 26/11 हल्ल्याआधी साजीर मीरकडून मला मेसेज आला होता ज्यामध्ये प्रक्रिया सुरु झाली आहे असं सांगण्यात आलं होतं.
- 2004मध्ये माझ्या लष्कर-ए-तोयबाच्या ट्रेनिंगदरम्यान झकी-उर-रहमान लखवीने माझ्यासमोर प्रेझेंटेशन सादर केलं होतं ज्यामध्ये एलईटीकडून पैसे घेऊन भारतीय यंत्रणांशी माहिती शेअर करणा-या भारतीयांची हत्या केल्याचं दाखवण्यात आलं.
- 26/11 नंतर तहव्वूर राणाने सांकेतिक भाषेत बोलता यावं यासाठी माझ्याकरिता बोगस मेल आयडी तयार केला होता.
- तहव्वूर राणावर अमेरिकेत चालवण्यात आलेल्या खटल्यादरम्यान २६/११चे हल्लेखोर व त्यांचे कराचीतील साथीदार यांच्यादरम्यान झालेल्या संभाषणाचे लेखी पुरावे ज्युरींसमोर सादर करण्यात आले होते. मात्र त्यांचे संभाषण पंजाबी भाषेत असल्याने त्याचे रेकॉर्डिंग सादर न करता इंग्रजी भाषांतर केलेले लेखी पुरावे ज्युरी व मला देण्यात आले. मात्र माझ्या सुनावणीदरम्यान FBIने मला रेकॉर्डिंग ऐकवून त्यातील आवाज ओळखण्यास सांगितले होते. त्या रेकॉर्डिंगमध्ये माझा आवाज नव्हता.
- दहशतवादी कसाबची सुटका व्हावी यासाठी साजिद मीरने प्रयत्न केले होते. त्यासाठी नरिमन हाऊसमधील लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. याप्रकरणी २६/११च्या हल्लेखोरांनी इस्रायलच्या दूतावासातील अधिका-यांशी बोलणी अशी सूचना साजिद मीरने दिली होती.
- डिसेंबर 2008मध्ये माझ्या ठावठिकाणाचा पत्ता लावण्यासाठी एफबीआयने माझ्या नातेवाईकांची चौकशी केली होती
- 26/11 हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांना निशान-ए-हैदर पुरस्कार देण्याबद्दल मी तहव्वूर राणाशी बोललो होतो