कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल, असा आशिर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नेत्यांमध्ये टोकाची इर्ष्या पाहायला मिळाली असताना विरोधकाच्या घरी जाउन प्रतिस्पर्ध्यांची भेट घेत एक वेगळाच संदेश माने यांनी दिला आहे. धैर्यशील माने सुद्धा माझ्या नातवासारखे आहेत, जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा, असा आशीर्वाद शेट्टींच्या आईंनी माने यांना दिला.तुम्हाला भेटायला म्हणून मी खास आलोय, असे माने राजू शेट्टी यांच्या आईचे पाया पडून आशिर्वाद घेताना म्हणाले. आशिर्वाद माझा भरपूर आहे, माझा मुलगा जसा केला, तसे कर, माझा आशिर्वाद मोठा आहे, असा आशिर्वाद त्यांनी दिला. तुमच्या आशिर्वादाने सगळेच चांगले होतेय, तुमचा आशिर्वाद असल्यावर काही कमी पडणार नाही, असे माने यांनी सांगितले.