मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी सभागृहात त्यांना परखडपणे उत्तर दिले नाही, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गृहखात्याच्या कारभारावर नाराज आहेत, अशा बातम्या काही प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. मात्र, या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे.
अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. प्रत्येकाची आपापली स्टाईल, शैली असते. उलट विधानसभेतील माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून माझे अभिनंदन केल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याच्या हाताळणीवरून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात खमकेपणाने प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु, दिलीप वळसे-पाटील यांनी बॅकफूटवर जाऊन सावध पवित्रा घेतला. फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आक्रमक आणि सडेतोड भाषण करण्याची गरज होती, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांदेखत नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसार माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र, आता या बातम्यांचे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे.