लातूर : भाजपा कार्यकर्त्यांच्या विसंवादामुळे माझे कुटुंब दहशतीखाली आले. विरोधी विचार मांडणे म्हणजे दुश्मन होतो काय ? हजारभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या; त्याच्या विरोधात प्रश्न फक्त शेतकरी मोर्चानेच विचारायचे काय ? फडणवीस सरकारच्या साक्षीने माझा दाभोलकर, पानसरे करणार आहात काय ? आणि जरी तो झाला तरी मी माझ्या भूमिकेपासून हटणार नाही, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या विरोधी आंदोलनकर्त्यांना फटकारले.ते लातूर येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शनिवारी दयानंद सभागृहात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार व माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे होते. डॉ. सबनीस म्हणाले, जसा मुलगा आईला, मराठी माणूस शिवबाला ऐकेरी हाक देतो तशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी ऐकेरी हाक दिली आहे. दोन वाक्यावर न जाता भाजपा कार्यकर्त्यांनी माझे भाषण ऐकावे. ते मोदींच्या गौरवार्थ नसेल तर विधानसभेजवळ जाहीर फाशी द्यावी.दोन मते असणारी माणसे लोकशाहीत राहू शकत नाहीत ? मी गोध्राकांडातील मतभेदांवर भाष्य केले म्हणजे तुमचा दुश्मन कसा काय झालो ? संघाला न आवडणाऱ्या महात्मा गांधी यांच्या फोटोला मोदींनी लोकसभा जिंकल्यावर लोकसभेत फुले वाहिली. विरोधी विचारांचा सन्मान करणारी ही कोणती भूमिका होती ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात भाषण करताना न्या. रानडेंना ब्राह्मण्यत्वातून बाजूला सारित ‘द ग्रेट मॅन’ म्हटले; ही कोणती भूमिका होती? किंबहुना आधी गांधी परंपरेतील काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांशी समन्वय साधून आंबेडकरवादी रामदास आठवलेंनी नामांतराची लढाई जिंकली, ही कोणती भूमिका होती ? ही समन्वयाची भूमिका माझी आहे. लोकशाहीत विचारांचा सन्मान करणार आहात की नाही ? (प्रतिनिधी)मुडदे पडले सरकार-लोकांनी काय केले ? एका प्रामाणिक लेखकाचा मुडदा पाडला जात असेल तर याची जबाबदारी कुणावर ? दाभोलकर गेले, पानसरे गेले, सरकारने काय केले ? सरकारचे जाऊ द्या, लोकांनी काय केले ? एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सरकारने काय केले ? लोकांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी काय केले ? मग ज्या शेतकऱ्याची भूमिका घेऊन लिखाण केले. भाषण केले तर गुन्हा कसा ठरतो, असा सवाल त्यांनी केला. मुडदे पडले सरकार-लोकांनी काय केले ? एका प्रामाणिक लेखकाचा मुडदा पाडला जात असेल तर याची जबाबदारी कुणावर ? दाभोलकर गेले, पानसरे गेले, सरकारने काय केले ? सरकारचे जाऊ द्या, लोकांनी काय केले ? एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सरकारने काय केले ? लोकांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी काय केले ? मग ज्या शेतकऱ्याची भूमिका घेऊन लिखाण केले. भाषण केले तर गुन्हा कसा ठरतो, असा सवाल त्यांनी केला. डाव्यातल्या ‘ब्राह्मण्यां’चेकाय करायचे ? आता पुरोगामी सुद्धा ढोंगी निघालेत. एका आंबेडकरवाद्याने फतवा काढला की ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणू नका, तर ‘नामदेव तुकाराम’ म्हणा. कारण ज्ञानेश्वर ब्राह्मण होते. मुंज झाली नसतानाही पुरोगाम्यांनी ज्ञानेश्वरांचे ब्राह्मणविरोधामुळे भागवत पंथांची चौकट नाकारली. ही कसली जातीयता. ब्राह्मणत्व हे ब्राह्मणातच नाही तर आता मराठे आणि दलितांसह साऱ्या जातीत पसरते आहे. डाव्यातल्या या ब्राम्हण्याचं काय करायचं ? सोडायचे की नाही ? जातीचे, धर्माचे, पंथांचे बुरखे सोडा आणि समन्वयाचा माणसूपणाचा मध्यममार्ग स्वीकारा, आपण आधी माणूस आहोत, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करीत टीका करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांना शनिवारी लातुरातील भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले़ ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सबनीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम लातूर या त्यांच्या मायभूमीत आयोजित करण्यात आला होता. मात्र सोहळ््याच्या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली़ पोलिसांनी जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ सबनीस यांच्या मोदींसंदर्भातील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सत्कारस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ सभागृहाचे प्रवेशद्वार उघडताच भाजपा कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला़ थेट व्यासपीठावर जात तेथील बॅनर फाडले़ ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद़़़ श्रीपाल सबनीस मुर्दाबाद़’़़ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हा सर्व प्रकार पाहून साहित्यिक सभागृहाबाहेर येऊन थांबले़ त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली़ या बैठकीत माजी खा़ डॉ़ जे़ एम़ वाघमारे यांनी सत्कार सोहळा रद्द न करता तो घेण्याचा निर्णय घेतला़ तब्बल २०० पोलीस घटनास्थळी संरक्षणार्थ तैनात करण्यात आले़ पुतळ्याचे दहन : श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळयाचे दहन केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़चूकच नाही,तर माफी कशी मागूउमरगा (जि. उस्मानाबाद) : मराठवाडी बोली भाषेत जिव्हाळा, प्रेम असणाऱ्या व्यक्तीबद्दल एकेरी बोलले जाते. त्या संस्कारातून प्रेमापोटी मी पंतप्रधानांचा गौरव केला. माझ्या भाषेमध्ये माझी राष्ट्रभावना आणि पंतप्रधान मोदी यांच्या जीवाची काळजी हा आशय समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत, ग्रामीण भाषेचा विपर्यास होऊ नये. मी प्रेमापोटी पोटतिडकीने बोलतो, ही माझी चूक आहे का? माझी चुकच नाही तर मी माफी कशी मागू? असा सवाल डॉ. सबनीस यांनी केला. शनिवारी येथील कॉ. विठ्ठल सगर यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्यानिमित्त ‘सांस्कृतिक दहशतवाद एक आव्हान’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.वक्तव्य बालीशपणाचे - दानवेजालना : श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य बालीशपणाचे असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेत केली. खा. दानवे म्हणाले की, एखाद्या व्यक्तिचे विचार पटत नसतील तर त्याला विरोध करण्याची एक पद्धत असते. सबनीस यांनी तसे न करता पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला. एकेरी उल्लेख केल्याने कुणावर त्याचा परिणाम होत नसतो. मात्र बोलणाऱ्याची पातळी काय आहे, हे त्यातून दिसून येते. हे कोण सबनीस कालपर्यंत कुणाला माहितीही नव्हते, असा टोलाही खा. दानवे यांनी लगावला.
माझा दाभोलकर, पानसरे झाला तरी भूमिका सोडणार नाही !
By admin | Published: January 03, 2016 2:24 AM