ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 1 - माझं कूळ आणि मूळ शिवसेना आहे, मुंबई महापालिकामध्ये शिवसेनेचा महापौर झाल्यास तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंचे विश्वासू आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले. आज त्यांनी पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर हजेरी लावली त्यावेळी ते बोलतं होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत मनसे शिवसेनाला पाठिंबा देऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ते म्हणाले, मुंबईतील महापौर कुणाचाही असो पण तो शाहू- फुले -आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारांचा असावा. या निवडणुकीत भाजपाला जनतेने भरघोस यश दिले आहे. पंचायत समिती ते लोकसभा एकच सरकार असावं म्हणून जनतेने भाजपला मतं दिली हे मान्य करावं लागेल, असंही नांदगावकर म्हणाले. यंदा इलेक्ट्रानिक व्होटिंग मशिनबाबत खूप तक्रारी आहेत. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही यावेळी नांदगावकरांनी केली.मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपामध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. पाच अपक्षासह शिवसेनेकडे 89 नगरसेवक झाले आहेत. तर भाजपाला एका नगरसेवकाने पाठिंबा दिल्याने त्यांच्ये संख्यबळ 83 झाले आहे.