मुंबई - भाजपालाशिवसेना संपवायची आहे. बंडखोरांना पक्षही चोरायचाय आणि माझे वडीलही चोरायला निघालात? ही कसली मर्दुमकी, कसली बंडखोरी? ही बंडखोरी नव्हे तर हरामीपणा आहे. तुम्ही दरोडेखोर आहात, हिंमत असेल तर शिवसेनाप्रमुखांचा माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. आपल्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्या आणि मते मागा अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला परंतु आजचा जो प्रयत्न आहे तो फोडायचा नाही तर संपवायचा आहे. शिवसेना-ठाकरे नाते जर तोडायचं असेल तर हे बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरे जा. गद्दारांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. म्हटलं आम्ही नाही बोलत. तुमच्या हाताने तुमच्या कपाळावर शिक्का मारुन घेतलाय तो बोलतोय असा घणाघात ठाकरेंनी शिंदेंवर केला.
शिवसैनिकांना आवाहनशिवसेनेची ताकद काय आहे ते आता जगाला समजू द्या. माझ्या वाढदिवसाला मला पुष्पगुच्छ भेट म्हणून नकोत. तुमच्या सह्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याकडे आले पाहिजेत. हेच माझ्या वाढदिवसाचे गिफ्ट मी समजेन असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे.
...तर आज मनावर दगड ठेवायला लागला नसताशिवसेनेने ज्या दगडांना शेंदूर फासला तो आता शिवसेना गिळायला लागला आहे. यांचे कर्ते-करविते महाशक्ती म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचे संचालक आहेत. त्यांना शिवसेना संपवायची आहे. परंतु भाजपाला माहिती नाही त्यांनी कुणाची पंगा घेतलाय. शिवसैनिक सामान्य पण त्यांची ताकद असामान्य आहे. विधानसभा निवडणुकीवेळी जे ठरलं होतं ते केले असतं तर आज मनावर दगड ठेवावा लागला नसता. भाजपानं एका दगडाला शेंदूर फासला आहे. हेच तुमचं आधी ठरलेलं मग तेव्हा का नाही सांगितले असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. काळाचौकी येथील शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्धाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहचले होते. त्याठिकाणी ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.