हिंगोली – अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे गेल्या ५ महिन्यात जवळपास २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २२ ऑक्टोबरला शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला होता, मात्र दिवाळी आली तरी अद्यापही शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून अपेक्षेने पाहत आहेत.
यात समिक्षा सावके नावाच्या चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, माझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके आणि कपडे घेतले नाही. या वर्षी आमच्या गावात पाऊसामुळे लय पाणी आलं. या पावसामुळे सोयाबीन कमी झाले, आपल्याकडे पैसे नाहीत असं बाबा म्हणाले तसं यावर्षी आपलं कर्जही माफ झालं नाही, उडीद खराब झाले असंही समिक्षाने पत्रात सांगितले आहे.
तसेच माझे बाबा रात्री वावरात पाणी पाजायला जातात. दिवाळी असल्याने त्यांना घरी राहा म्हंटले. पण दिवसा लाईट नाही असं बाबांनी सांगितले. मी आणि माझ्या भावाने बाबांना फटाके आणि कपडे घ्या म्हंटलं पण नुकसानीचे पैसे बँकेत आल्यावर घेऊ असं बाबांनी सांगितले. आम्हाला दिवाळीत कपडे नाही, फटाके नाही, त्यामुळे आईला सांगितलं तर आई-बाबा दोघं भांडण करतात म्हणून नुकसानीचे पैसे बँकेत टाकावे अशी विनंती समिक्षा सावके हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.
हिंगोलीत नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे.
दिवाळीपर्यंत पैसे देण्याचा होता सरकारचा दावा
निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्याना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविलं होतं. परवानगी मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळायला सुरूवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याचं दिसून येत आहे.