महाविकास आघाडीने भाजपाचे एकेकाळचे शिलेदार व माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजपाने देखील राज्यसभेसारखीच मविआच्या उमेदवारांना धूळ चारण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर खान्देशातील एक आमदार अचानक राष्ट्रवादीचे सर्व आमदार, अपक्ष आणि उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असलेल्या हॉटेल ट्रायडन्टवर दाखल झाल्याने चर्चांना उधान आले होते.
राज्यसभेला एमआयएमने आपण महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेनेला मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू त्यांनी खरेच कोणाला मतदान केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयएम ही ब टीम असल्याचे दावे मविआमधील पक्ष आणि भाजपा एकमेकांवर करत आले आहेत. या साऱ्या घडामोडींवर आता एमआयएम आमदारच पवारांना भेटायला आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
धुळ्याचे एमआयएम पक्षाचे आमदार फारुख शाह हे ट्रायडन्टवर गेले आहेत. तिथे काही वेळापूर्वीच अजित पवारही पोहोचले आहेत. एकनाथ खडसेंना मी माझे पहिल्या पसंतीचे मत देणार असल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसेंनी खान्देशासाठी चांगली कामे केली आहेत. यामुळे मी माझे पहिले मत त्यांनाच देणार. यासाठी मी अजित पवारांना भेटण्यासाठी आलो आहे, असेही शाह यांनी म्हटले आहे.