आधीच पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडीला वाहन चालक त्रासले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आदी महोदयांसाठी वाहतूक अडवून मार्ग काढून दिला जातो. यामुळे जनतेला नाहक त्रास होतो. वेळ वाचावा म्हणून महत्वाच्या व्यक्तींसाठी हे केले जात असले तरी ही बाब मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना खटकली आहे.
माझ्या वाहनांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांना मार्ग दिल्याने वाहतूक कोंडी होते, वाहने थांबवावी लागतात असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. यामुळे पोलीस दलावरील सुरक्षेचा आणि वाहतूक कोंडी सोडविण्याचा ताण देखील वाचणार आहे. महत्वाच्या कामांना जात असलेल्या लोकांचा देखील खोळंबा होत असल्याने शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायालयाच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे उतरविण्यात आले होते. आता हा निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने जनतेचे आणि पर्यायाने देशाचा इंधन बचतीचा फायदा होणार आहे. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे शिंदे यांचे म्हणणे आहे.
शिंदेंचा ताफा आता कमी पोलीस संरक्षणात वाहतूक न थांबविता रवाना होणार आहे. यासाठी पोलिसांना मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे. तसेच बैठकांना वेळेवर पोहोचण्याचे आव्हानही शिंदे यांना पेलावे लागणार आहे. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.
यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.