ठाणे : विविध कारणांमुळे घर सोडून पळालेल्या आणि नंतर आपल्या माणसांच्या भेटीची स्वप्ने पाहणाऱ्या सुमारे १२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विशेष उपस्थित होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमाला माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, समाजसेवक विजय कडणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माय होम इंडियाच्या कार्यावर आधारित एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. तसेच राज्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार देवधर यांनी केला.या वेळी माय होम इंडियाच्या कार्यात सहभागी होणाऱ्या शंकर शेठ, शेखर फडके, विलास शिंदे, ज्योती सातपुते, निर्माण राठी, राजेंद्र मेहता, जयवंत मालणकर, दिलीप मालणकर, गजानन रत्नपारखी, स्पार्क इंडिया संस्था यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. काही मुले घरातील भांडण, राग, क्लेष यामुळे घर सोडतात. बालगृहातील अशा मुलांना सांभाळून, त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून त्यांची घरवापसी करणे, हे मोठे पुण्याचे काम माय होम इंडिया करते आहे, असे मत राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच एखादा मुलगा १० वी नापास झाला की, त्याला आजूबाजूच्या लोकांकडून वारंवार बोलणे ऐकावे लागते आणि त्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन ती मुले घर सोडून जातात. हेच ओळखून सरकारने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने तत्काळ दुबार परीक्षा घेऊन संस्थेच्या कार्याला एक प्रकारे हातभारच लावला आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)माय होम इंडियाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील जनतेला आपल्याशी जोडले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून देशातच अनेक ठिकाणी त्यांना विदेशी समजले जाते. मात्र, हा त्यांचा अपमान आहे. आपल्याइतकेच देशप्रेम, राष्ट्रभक्ती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे त्यांचा अपमान आपण थांबवला पाहिजे, असे मत देवधर यांनी व्यक्त केले. केवळ ईशान्य भारतातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम ‘माय होम इंडिया’ २०१३ पासून करते आहे, असे त्यांनी सांगितले. भारतमातेच्या जयजयकाराने देवधर यांनी आपले मनोगत संपवले.
मुलांची घरवापसी हे माय होम इंडियाचे पुण्याचे काम
By admin | Published: August 27, 2016 4:24 AM