माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर! माझा नवरा येऊन...; सुप्रिया सुळेंचा अजित दादांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 04:01 PM2024-02-26T16:01:58+5:302024-02-26T16:06:39+5:30
यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत...
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी राज्यातील सर्वच इच्छूक नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. आपापल्या मतदार संघात त्यांचे दौरेही सुरू झल्याचे दिसत आहे. मात्र, यावेळी राज्यातील बारामती मतदार संघावर आतापासूनच सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि जनतेला अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर -
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला हवं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. नवऱ्याचं काय काम इकडे? आमचे लग्न म्हणजे आती क्या खंडाला. काय इकडे तिकडे नाही जायचं. तुम्हाला असं पाहीजेल, जिथे माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार आहे. नवऱ्याने कॅन्टिनमध्ये बसायचं. माझा नवरा येत नाही. पण, ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना, त्याने यांचं पार्लमेंटमध्ये आणि बायको आत गेली की बसायचं कँटिनमध्ये पर्स घेऊन." सुप्रिया यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हाशा उडाला. यावर सुप्रिया म्हणाल्या चेष्टा नाही, सिरियस, मी चेष्टा करत नाहीय.
तुम्हाला कसा हवाय खासदार?
पार्लमेंटमध्ये मध्ये नोट पॅड लागतो मॅडम पर्स नाही लागत. पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत. तिथे नोट पॅड पेन अथवा आय पॅड लागतो, मग पार्लमेंटमध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या भागामध्ये कुठेही अलाऊड नसते. कँटिनमध्ये बसा. मग तुम्हाला कसा हवाय खासदार, तिथे बोलणारा हवा की नवरा बोलणारा हवाय? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते भाषण करतील. द्याल का मला मतं? कुणाकडे बघू मत देणर? मी की सदानंद सुळे? जाणार कोण तेथे? त्यामुळे विचार करून मतदान करा. सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केलं, तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोसायचे आहे. तेथे जाऊन विषय मला मांडायचे आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.