लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या चाहुलीमुळे राज्यातील वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगू लागला असून शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलल्यावर काय होते ते सांगितले आहे.
मी जेव्हा जेव्हा संसदेत बोलते तेव्हा तेव्हा माझ्या नवऱ्याला आयकर विभागाची नोटीस येते. यंदाच्या बजेटवेळच्या भाषणानंतरही माझे पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली होती. ही पहिलीच वेळ नाहीय, मी संसदेत बोलले की नेहमीच येते. यात प्रश्नही एकसारखेच असतात, असा दावा सुळे यांनी केला आहे.
सोमवारी सुळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयकर विभाग, सीबीआय आणि ईडी सारख्या एजन्सींमुळे राजकीय विरोधकांचे फोन हॅक करण्यासाठी कोणत्या वेगळ्या अॅपची गरज नाहीय, असा टोलाही त्यांनी फोन हॅक झाल्यावरून लगावला.
मला अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. तो मी जेव्हा उघडला तेव्हा माझा फोन फ्रीज झाला. माझी सहकारी आदिती हिचाही फोन हॅक झाला होता, असे त्या म्हणाल्या. या सरकारला दोन वर्षे झाली आहेत. लाडकी बहीण योजना आधी का आणली नाही, आता का आणली. या सरकारमध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढत असून आज भाजप हा भ्रष्टाचाराचा पक्ष बनला आहे, असा आरोप सुळे यांनी केला.