मिरज : नाट्यसृष्टीने मला मोठे केले. नाटक आणि नाटक हेच आपले आयुष्य असल्याचे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितले. जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मिरजेतील नाट्य रसिकांतर्फे त्यांचा सत्कार आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आला.मोहन जोशी म्हणाले, रंगभूमीमुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला चांगल्या संधी मिळाल्या, चित्रपट दुनिया कळाली. नाट्यसृष्टीने मला मोठे केले असल्याने नाटक हेच माझे आयुष्य आहे. कला व अभिनय क्षेत्रासाठी यापुढेही कार्य करीत राहणार आहे. यावेळी नाटक व चित्रपटातील अनुभवांना जोशी यांनी उजाळा दिला. आ. खाडे यांनी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. भाजप नेते दीपक शिंदे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी जोशी यांचा गौरव केला. ओंकार शुल्क यांनी प्रास्ताविक केले. कविता घारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत गोखले, बाळासाहेब बरगाले, राम कुलकर्णी, विनायक इंगळे, चंद्रकांत देशपांडे, डॉ. विनिता करमरकर, अनुजा कुलकर्णी, धीरज पलसे, ऋषिकेश कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, रविकांत साळुंखे उपस्थित होते.
नाटक हेच माझे आयुष्य: मोहन जोशी; मिरजेत रसिकांकडून सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 1:51 PM