लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘१९८२ साली ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाला होता. त्यानंतर, उपचारादरम्यान २०० दात्यांनी मला ६० बॉटल्स रक्तदान केले होते. त्यातील एका दात्याला हेपिटायटिसची लागण होती, त्यामुळे मलाही ‘हेपिटायटिस बी’ची लागण झाली. २००० सालापर्यंत माझी प्रकृती ठीक होती, मात्र, अपघाताच्या १८ वर्षांनंतर वैद्यकीय चाचणीदरम्यान माझे ७५ टक्के यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. त्यामुळे सध्या माझे केवळ २५ टक्के यकृत कार्यरत आहे,’ असे हेपिटायटिसशी संघर्ष केलेल्या ‘बिग बी’ यांनी उपस्थितांसमोर सांगितले.जागतिक आरोग्य संघटनेच्या कावीळ (हेपिटायटिस)च्या साथीबाबत व त्याच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यासाठी शुक्रवारी नव्या मोहिमेला आरंभ करण्यात आला. या मोहिमेचे दक्षिण पूर्व आशिया विभागाचे सदिच्छा दूत म्हणून बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी बिग बी यांनी हेपिटायटिसशी स्वत: दिलेल्या संघर्षाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. ‘काविळीविरुद्धच्या मोहिमेसाठी मी कटिबद्ध आहे. ‘हेपिटायटीस बी’ प्रकारच्या काविळीला मीसुद्धा बळी पडल्याने या आजाराच्या वेदना, त्यामुळे होणारा त्रास मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. या संसर्गजन्य काविळीला कुणीही बळी पडू नये,’ असे ते म्हणाले. प्रत्येक भारतीयाकडून जो आवाज आदराने ऐकला जातो, असा आवाज अमिताभ बच्चन यांना लाभला आहे. पोलिओमुक्तीसाठी घेण्यात आलेल्या मोहिमेदरम्यानही हा अनुभव आम्ही घेतल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.२०३०पर्यंत सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचविणारी कावीळ नामशेष करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांना ‘बिग बी’ यांच्या सहभागामुळे अधिक जोर येणार आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व भागाच्या विभागीय संचालिका डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी केले.दरवर्षी ४ लाख रुग्णांचा मृत्यूसंसर्गजन्य काविळीमुळे दक्षिण पूर्व आशियात ४ लाख १० हजार रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो व या रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण हे त्यांच्या उमेदीच्या वयात असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, या भागातील जवळपास ९० दक्षलक्ष व्यक्तींमध्ये यकृताचा कर्करोग किंवा सिरॉसिस हा आजार बळावतो आहे.
माझे यकृत २५ टक्केच कार्यरत
By admin | Published: May 13, 2017 2:32 AM