महिलांनी आपल्या देशात आधीच खूप भोगलेले आहे. यामुळे महिलांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करू नये. हे चुकीचे वाटते. त्यापासून दूर रहावे. आपल्या देशात, महाराष्ट्रात हेच होते. कोणी काही बोलले की त्यावर आंदोलने होतात. परंतू आधीच बोलताना काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
जर कोणी नेता बायकोला कुठे पार्टनर बनवत असेल, ती बिचारी साधी असते. तिला कोणत्या कंपनीत पदाधिकारी बनविले आणि तिथे जर घोटाळे झाले, आणि त्यावर कोणी आक्षेप घेतला तर त्या महिलेवर टीका करू नये. राज्यातील प्रश्नांवर लक्ष न देता तुम्ही तुमचे खिसे भरण्यासाठी लक्ष देत असाल तर ते चुकीचे आहे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
महावसुली आघाडी सरकारची जी कामे सुरु आहेत, जगही बोलतेय की दुजाभाव सुरु आहे. एकाच्या बाबतीत वेगळी कारवाई, दुसऱ्याच्या बाबतीत वेगळी कारवाई केली जातेय. आरएसएस महिलांचा आदर करते, स्रीचा जर सर्वाधिक आदर कोणी करत असेल तर आरएसएस आहे, असेही त्या म्हणाल्या.
तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीस यांची बायको आहे, जेव्हा मी काही बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा अन्य गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून बाहेर पडते. या बायका बोलतात की माझे मानसिक संतुलन ढासळले आहे, तसे काही नाहीय. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. तुम्ही यावर बोलणार नसाल तर काय कराल, असेही अमृता यांनी त्यांच्यावरील टीकेवर उत्तर देताना म्हटले आहे.