मुंबई : कोरोनोत्तर काळात स्वत:ला सावरण्याबरोबरच राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या धर्तीवर आता प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबवावे, असे आवाहन महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे यांनी पत्रकाद्वारे केले. अनावश्यक बाबींना कात्री लावून, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यालयातील कार्यपद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक कराव्यात. नागरिकांना कार्यालयात कमीत कमी वेळा यावे लागेल, अशी सुधारणा करावी. उद्योग व व्यापार यांना पोषक वातावरण तयार करावे, लालफितीला फाटा देऊन नावीन्यपूर्ण कल्पनांना उत्तेजन द्यावे. शेतकरी, मजूर, अन्य गोरगरीब बांधव यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.गरज आहे साैजन्याचीराज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय नोकरी ही वेतन घेऊन समाजाची सेवा करण्याची संधी आहे, असे मानून कार्यसंस्कृती उन्नत करावी आणि आपल्या राज्याची विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाने केले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मागे महासंघ कायम असेल. सहकारी, तसेच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे, असेही पत्रकात नमूद आहे.
‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:22 AM