राष्ट्रवादीचे माजी आमदार निलेश लंकेंनी कोरोना काळात लोकांवर वैद्यकीय उपचार करून राज्यात प्रसिद्धी मिळविली होती. राष्ट्रवादीची दोन शकले झालेली असताना लंकेंनी अजित पवारांच्या गटात उडी मारली होती. परंतु जेव्हा लोकसभेची वेळ आली तेव्हा लंके आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आले आणि अहमदनगरचे उमेदवारही झाले. या लंकेंनी आज उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये संपत्ती जाहीर केली आहे.
निलेश लंके यांची थेट लढत ही सुजय़ विखे पाटील यांच्यासोबत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपत्ती किती ते जाहीर केले आहे. निलेश लंके यांची इथे प्रॉपर्टी आहे, तिथे प्रॉपर्टी आहे असे अनेकदा आरोप झाले होते. यावर लंके यांनी मी समाजासाठी काम करतो, माझी प्रॉपर्टी दाखवा मी उमेदवारी अर्ज देखील भरणार नाही, असेही सांगितले होते, असे म्हटले आहे. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो, मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा केली पाहिजे हाच उद्देश ठेवून मी काम करतो आहे, असे ते म्हणाले.
लंके यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार संपत्तीच्या तुलनेत त्यांच्यावर कर्ज जास्त आहे. लंके यांनी ४४ लाख ३२ हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर त्यांच्यावर ३७ लाख ४८ हजार रुपयांचे कर्जही आहे. आमदार लंके यांच्याकडे २० हजारांचे शेअर्स आहेत. निलेश लंके यांची संपत्ती २९ लाखांनी घटली आहे.
तर दुसरीकडे सुजय विखे यांच्या संपत्तीच २०१९ पेक्षा वाढ झाली आहे. महायुतीचे उमेदवार विखे यांच्याकडे २०१९ मध्ये १६ कोटी ८६ लाखांची संपत्ती होती. सध्या त्यांच्याकडे २९ कोटी १८ लाख एवढी संपत्ती आहे. तशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.