नागपूर : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आपला प्रस्ताव होता, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यास मान्यता दिली. पक्षाला सोनिया गांधींसारखे ‘रिमोट कंट्रोल’ नको असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकारमध्ये सहभागी झालो, असेदेखील त्यांनी सांगितले. मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार ५० टक्के राष्ट्रवादीचे, ४० टक्के काँग्रेसचे आणि उरलेले १० टक्के शिवसेनेचे होते. शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार असून, या यशात माझाही हातभार असेल, असा दावा फडणवीस यांनी केला. शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री हे पद समांतर मुख्यमंत्री नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले फडणवीस...अद्याप मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ. कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. ते व्यावहारिक होतील, अशी आशा आहे.