लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर अजित पवार नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू असताना त्याला सुळे यांनी चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे. ‘अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचे पद हे मुख्यमंत्री समान असते. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्याध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे’, असे सुळे यांनी ठणकावून सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली. त्यानंतर सुळे यांनी पुण्यातील गांधी स्मारकाला अभिवादन करून नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या.
यावेळी अजित पवार नाराज असल्याबद्दल पत्रकारांनी सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, ‘कोण म्हणाले ते नाराज आहेत? तुम्ही त्यांना जाऊन विचारले आहे का? त्यांच्या नाराजीविषयी केवळ गॉसिप आहे. पण, प्रत्यक्षात काय आहे? ते वेगळेच आहे.’
‘होय, ही घराणेशाहीच’
- घराणेशाहीविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘होय, ही घराणेशाहीच आहे. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे.
- आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन त्यांच्याकडे असतात. देशात खासदार म्हणून माझा पहिला क्रमांक येतो, तेव्हा माझे वडील संसदेत मला पास करत नाहीत.
तिकीट वाटपात मला कोणाचा विरोध नसेल : अजित पवार
सातारा : ‘पक्षाला उभारी येण्यासाठीच पक्षाध्यक्षांनी कामे व जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. नवीन कार्याध्यक्षांना थोडा वेळ दिला पाहिजे. मलाही पक्षाने विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाकरी फिरवली वगैरे काही नाही. हे विरोधी पक्षांनी व मीडियाने चालवले आहे. पक्ष स्थापनेपासून निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे कधीच नव्हती. तरीही माझे निर्णय डावलले जात नाहीत. यापुढेही मला कोणी विरोध करणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. रविवारी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘माझ्यावर जबाबदारी टाकलेली नसल्याचे संदेश फिरत आहेत; परंतु माझ्यावर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे; तसेच पक्षाचे विविध दौरे, पक्षीय अधिवेशने व कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर फिरून माझी जबाबदारी पार पाडतच आहे. मला केंद्रातल्या राजकारणात रस नसून राज्यात काम करायचे आहे.’
पवारांनी भाकरी फिरवली नाही : फडणवीस
नागपूर : ‘शरद पवार यांनी कुठलीही भाकरी फिरविलेली नाही. मुळात झालेल्या एकूण घडामोडीत भाकरी फिरविली असे मला वाटत नाही. ही धूळफेक असून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,’ या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.