राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाश्यापालन उद्योग राबविला जातो. मधमाश्यापालन हा उद्योग शेतीपूरक व्यवसाय असून, व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यास जागा, इमारत, वीज, पाणी यासाठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. मधमाश्या मध तयार करतात. मध शक्तिदायक व पौष्टिक अन्न व औषध आहे. मधमाश्या मेण देतात.
तो सौंदर्यप्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाश्यांपासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली, दंश, विष, व्हिनम), पराग (पोलन), रोंगणे (प्रो पॉलीस) पदार्थांना उच्चप्रतीचे औषधमूल्य आहे. परागीभवनाद्वारे शेती, पिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढीस मदत होते. शेतकऱ्यांनी उद्योग करावयाचे ठरविल्यास त्यास मधपाळाचे १० दिवसांचे प्रशिक्षण मधसंचालनालय महाबळेश्वर येथे दिले जाते. त्यानंतर मध उद्योगासाठी आवश्यक साहित्य मधपेट्या (वसाहतीसह) मधयंत्र व अन्य साहित्य रुपये ४२,७०० पुरविण्यात येते. यात प्रशिक्षण विनामूल्य, तसेच साहित्य खरेदीवर १०,००० पर्यंतचे अनुदान पश्चिमघाट विकास योजना/ जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दिले जाते.