शेती व्यवसाय करताना होणारे विविध अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, वाहन अपघात, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते. अथवा अन्य कोणत्याही अपघातामुळे शेतकऱ्यांवर मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या सदर अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचण होते.
अशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना लाभ देण्यासाठी शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत विमा हप्त्याची एकत्रित रक्कम शेतकऱ्यांच्या वतीने शासन अदा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा अन्य कोणत्याही संस्थेने त्यांच्या वतीने या योजनेंतर्गत स्वतंत्ररीत्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्यांचा या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही. या विमा योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. विहिती प्रपत्रे/ कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांनी वेगळ्याने सादर करण्याची आवश्यकता नाही.