शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांनी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू नये, यासाठी राज्य शासन विविध योजनांचा अवलंब करीत असते. त्यातील एक फलोद्यान लागवड योजना आहे.
यात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते, त्यासाठी शेतकऱ्याला पहिल्या वर्षीचा हप्ता ५० टक्के, दुसऱ्यावर्र्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के रक्कम अनुदान मिळते. दुसऱ्या वर्षीचे अनुदान मिळण्यासाठी बागेतील ७५ टक्के झाडे जिवंत असली पाहिजेत. तिसऱ्या वर्षीच्या अनुदानासाठी ९० टक्के झाडे बागेत सुस्थितीत असली पाहिजेत.
अनुदानासाठी बागेचे क्षेत्र ०.२० आरपासून चार हेक्टरपर्यंत असावे. कोकणासाठी ०.१० आरपासून दहा हेक्टर क्षेत्र असावे. अनुदान मिळविण्यासाठी फळबाग लागवडीची तयारी म्हणजे जमीन तयार करणे, खड्डे खोदणे आदी तयारी करावी लागते. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी याविषयी पाहणी करून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करतात. या अनुदानाविषयी अधिक माहिती तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असते.