राज्यातील गायी व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे शासनाने निश्चित केले. योजनेंतर्गत जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात येणार असून, सदर गावामध्ये योजनाबद्धरीत्या पशुसंवर्धक विषयक कार्यमोहीम हाती घेण्यात येते.
योजनेंतर्गत विभागाचे सर्वच कार्य- उदा.- जंतनाशके पाजणे, गोचीड- गोमाशा निर्मूलन, वंध्यत्व निर्मूलन, लसीकरण शिबिरे इत्यादी कामे निवडलेल्या दत्तक गावांमध्ये एकत्रितरीत्या आयोजित केली जातात. योजनेसाठी तारीखनिहाय कृती आराखडा सर्व संस्थांना देण्यात येतो. योजनेचे दूध वाढीचे उद्दिष्ट लक्षात घेता योजना सुरू करतेवेळी शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरनिहाय दूध उत्पादनाची आकडेवारी घेण्यात येऊन योजनेचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा दूधवाढीसंबंधी सर्व आकडेवारी घेण्यात येऊन नेमकी फलनिष्पत्ती काय झाली, याचा आढावा घेण्यात येतो. या योजनेचा लाभ हजारो शेतकऱ्यांनी घेतला आहे.