मुंबई – महाराष्ट्रात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आता उघडपणे नाराजी समोर येत आहे. मंत्री बनण्यासाठी काही आमदारांनी अनोखे प्रकार केले आहेत. त्यात काही आमदारांनी कॅबिनेटमध्ये संधी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इमोशनल ब्लॅकमेलदेखील करणे सुरू केले आहे. मीदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत होतो परंतु मुख्यमंत्र्यासमोरील अडचणी पाहता मी मागे हटलो असं विधान आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.
भरत गोगावले यांनी भाषणात म्हटलं की, आमचे मुख्यमंत्री कुठल्या अडचणीत सापडावे असं मला वाटत नाही. एका आमदाराने तर जर मला मंत्रिपद मिळालं नाही तर त्यांची पत्नी आत्महत्या करेल असं म्हटलं तर एकाने मंत्री नाही बनलो तर नारायण राणे संपवतील, माझे राजकारण संपेल असं सांगितले. इतकेच नाही जर मला संधी मिळाली नाही तर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर त्याचक्षणी मी राजीनामा देईन असं एकाने म्हटलं.
तसेच संभाजीनगरला फोन केला, म्हटलं काय रे संभाजीनगरला तुम्हाला ५ पैकी दोघांना दिले, आम्ही तीन पैकी एकही घेत नाही. थांबतो, तो म्हणाला तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावलं, आता बायकोवाल्याचे काय करायचे? साहेबांना बोललो, त्याच्या बायकोला जगवायला पाहिजे. त्याला मंत्रिपद देऊन टाका. दुसऱ्याला नारायण राणेने संपवायला नाही पाहिजे. आपली एक सीट कमी होईल. त्याला पण दे. मी थांबतो तुमच्यासाठी असं मी म्हटलं. आजपर्यंत मी थांबलोय असा किस्सा आमदार भरत गोगावले यांनी भाषणातून ऐकून दाखवला.
लोक आमच्यासोबत
रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकासकामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत, असे गोगावले म्हणाले.