ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 2- कर्जबाजारीपणामुळे मायलेकाने एकाच वेळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना १ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तालुक्यातील वरवंड येथे उघडकीस आली.
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वरवंड येथील मंगेश प्रल्हाद जाधव (वय ३१) याच्या वडिलाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. त्यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. या शेतीत काबाडकष्ट करून तो वृद्ध आईसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
या शेतीवर त्याने बँकेचे एक ते दीड लाख रुपये कर्ज काढल्याची माहिती नातेवाइकांनी दिली; परंतु गेल्या काही वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी, यंदा अत्यल्प पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे डोक्यावरील कर्ज व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न मंगेश जाधव व त्याची आई प्रमिला प्रल्हाद जाधव (वय ६५) या मायलेकांना पडला होता. या विवंचनेत एकाच वेळी दोन्ही मायलेकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली; मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.