जितेंद्र कालेकर, ठाणेरविवारी पहाटेच्या सुमारास वडवली गावात वरेकर कुटुंबातील १४ जणांचे हत्याकांड घडविणाऱ्या हसनैनचा मुख्य हेतू काय होता, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या बाजूंनी तपास होऊनही अद्याप उलगडा झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.हसनैन धार्मिक वृत्तीचा होता. त्यामुळे वडवलीव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या दर्ग्यावर त्याचे जाणे होते, तिथे तो कोणाच्या सर्वाधिक संपर्कात होता, याचा तपास सुरू आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये कव्वाली आणि गाणी आढळली आहेत. १४ जणांचे व्हिसेरा तपासणीसाठी दिले आहे. घटनास्थळी पांढरे रुमालही मिळाले आहेत. त्यात क्लोरोफॉर्म टाकून कुटुंबीयांना बेशुद्ध करून मग त्यांची हत्या केली का, अशा सर्वच बाबींचा तपास न्यायवैद्यक विभागाकडून केला जात आहे. याशिवाय, न्युरोवरील उपचाराच्या टॅबलेटही घटनास्थळी मिळाल्या आहेत.तपासात मनोविकारतज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. हा प्रकार सिझोफ्रेनिया तसेच दुहेरी व्यक्तिमत्त्व किंवा वैयक्तिक वादातूनही झाल्याची शक्यता तपासण्यात येत आहे.मैं तुम्हे भी नही छोडूंगा...हल्ल्याच्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे पोलिसांना सुबियाने जो जबाब दिला, तो आता महत्त्वपूर्ण ठरला आहे. पहाटे ३ वाजता तिला जाग आली. हॉलमध्येच आई, वडील, बहिणी आणि त्यांची मुले रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याच वेळी हसनैन तिच्यावर सुरा घेऊन धावून आला. ‘मैने सब घरवालों को खत्म किया है, मैं तुम्हे भी नही छोडूंगा...’ असे बोलून त्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती जीव वाचविण्यासाठी बेडरुममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला, असे तिने आपल्या जबाबात म्हटले आहे, मात्र हसनैनने हे कृत्य का केले हे ती देखिल सांगू शकली नाही.दोन तास बैठक : या प्रकरणाशी संबंधित पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे, सहायक आयुक्त दिलीप गोरे, सायबर क्राइम, गुन्हे अन्वेषण विभाग युनिट ५, कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आदी २० अधिकाऱ्यांची बैठक सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या कार्यालयात झाली. माहितीमध्ये एकसूत्रता राहण्यासाठी प्रसारमाध्यमांशी शक्यतो बोलणे टाळा, असेही आदेश या वेळी देण्यात आले. तसेच तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
हत्याकांडाचे गूढ चौथ्या दिवशीही कायम
By admin | Published: March 03, 2016 4:41 AM