मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या रक्त, लघवी आणि पोटातील पाण्याचे नमुन्यांचा अहवाल परस्परविरोधी आल्याने तिच्या बेशुद्धीचे गुढ वाढले आहे. कलिना येथील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात तिने कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्याचे आढळलेले नाही. तर माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाच्या अहवालानुसार, तिने अतिरिक्त प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे समोर आले आहे. इंद्राणीला शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास जे.जे. रुग्णालयात दाखल केले, तेव्हा ती बेशुद्ध होती. त्यानंतर तिला क्रिटिकल केअर युनिटमध्ये (सीसीयू) दाखल करून उपचार सुरु केले. ती दुसऱ्या दिवशी थोडी शुद्धित (सेमी कॉन्शियस) आली असून ती प्रगाढ निद्रावस्थेत (डीप स्लीप) अवस्थेत आहे. ही अवस्था ७२ तास राहते. त्यापैकी २४ तास उलटून गेले असल्याने पुढचे ४८ तास महत्त्वाचे असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. तिची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. तिचा रक्तदाब ११०/७० इतका आहे. पल्स ७३-८० आहेत. तिच्या शरीरातील पार्शल प्रेशल आॅफ कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण ४७वर गेले आहे. सामान्य प्रमाण ४५ इतके असते. त्यामुळे रक्तात कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढले असून फुफ्फुसातून हवा बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. तिला चार लिटर आॅक्सिजन प्रति तास दिला जाते आहे. इंद्राणीचा श्वासोच्छावास सामान्यपणे चालू नाही. तिच्या पोटातील विषारी घटक शुक्रवारी काही प्रमाणात काढले असले तरी अजूनही काही अंशी विषारी घटक शरीरात शिल्लक आहेत. इंद्राणीला बरे व्हायला अजून ३ दिवस लागतील. स्निग्ध पदार्थाच्या चयापचय क्रियेत मदत करणारी शरीरातील अत्यावश्यक रसायने सामान्यपणे काम करत आहेत. इंद्राणीला मानसिक आजार असल्यामुळे काही औषधे देण्यात आली होती, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वकिलाची न्यायालयात धावइंद्राणीची स्थिती समजताच तिची वकील गुंजन मंगलाने डॉ. लहाने यांची भेट घेतली. मात्र डॉ. लहाने यांनी मंगल यांना इंद्राणीला भेटू देण्यास नकार दिला. इंद्राणीला रुग्णालयात भेटू न दिल्याने तिच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. सीबीआयने उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याने दंडाधिकाऱ्यांनी या अर्जावरील सुनावणी काही दिवस पुढे ढकलली आहे. सीसीटीव्ही काढलेमहिला कारागृहाच्या बराकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र यामुळे आमच्या खासगी जीवनावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करीत महिला कैद्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे काढून घेण्यात आले. आता केवळ बराकीतून मोकळ्या जागेत आणि अन्यत्र जाण्याच्या मार्गावरच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.इंद्राणी मुखर्जीच्या विविध चाचण्यांसंबंधी माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाने दिलेला अहवाल आम्ही ग्राह्य धरणार आहोत. त्यात तिने अतिरिक्त प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे म्हटले आहे. - डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय
बेशुद्धीचे गूढ वाढले
By admin | Published: October 04, 2015 4:33 AM