मुंबई : राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण विविध जिल्ह्यांत आढळून येत असून, या रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यांत शोधाशोध करावी लागत असून, उपचारासाठी इतर जिल्ह्यांत धाव घ्यावी लागत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना लागणारे इंजेक्शन नगरमध्ये मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी माेठी धावाधाव होत आहे. काही रुग्णांनी उपचारासाठी पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे धाव घेतली आहे. सध्या जिल्ह्यात प्रत्येक दिवशी १०० ते १२५ इंजेक्शनची गरज लागत आहे.
औरंगाबाद, परभणी, जालना जिल्ह्यात या आजारावरील उपचारासाठी लागणारे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. इंजेक्शनची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने इंजेक्शनची मागणी कंपन्यांकडे नोंदविली आहे. बीड जिल्ह्यात उपचारासाठी लागणारे इंजेक्शन सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाहीत. खासगी औषध वितरकांनी इंजेक्शनची मागणी केली आहे, परंतु त्यांनाही अजून मिळाली नाहीत, अशी माहिती औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी दिली.
औषधांसाठी करावी लागते थेट मुंबईवारी साताऱ्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा १२ च्या पुढे गेला आहे. यावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे त्याच्या शोधार्थ नातेवाइकांना मुंबईची वारी करावी लागत आहे. इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे सध्या त्याचा काळाबाजारही होत असल्याचे आढळून येत आहे. अतिरिक्त पैसे मोजण्याची तयारी दाखवूनही औषधे मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार करायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.