मुंबई - जनतेतून निवडणून येण्याचे आव्हान करणाऱ्या विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. परंतु, त्यांच्यासाठी मतदार संघ कोणता यावरून मोठी चर्चा रंगली होती.ही चर्चा आता संपुष्टात आली असून ते कोथरूडमधून निवडणूक लढविण्याची शक्यात आहे. त्यामुळे कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि इच्छूक मुरलीधर मोहोळ यांना आमदार होण्याच्या महत्वाकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत चंद्रकात पाटील कोल्हापूर जिल्ह्यातून निवडणुकीला सामोऱ्या जाणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, त्याचवेळी त्यांचा सुरक्षीत मतदार संघाची चाचपणी देखील सुरू होती. त्यातच त्यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. तर गिरीश बापट दिल्लीत गेल्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही पाटील यांनाच मिळाली. त्यामुळे बापट यांच्या कसबा मतदारसंघातून पाटील निवडणूक लढविणार अशी चर्चा रंगली होती.
दुसरीकडे कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डळमळीत दिसत होती. तर नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचं उमेदवारीसाठी पारड जड दिसत होतं. त्यामुळे कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यात चुरस लागली होती. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये बॅनरवरून हाणामारी देखील झाली होती. परंतु, कोथरूडमधून उमेदवारीची माळ प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गळ्यात पडली असल्याने दोन्ही नेत्यांना आपली महत्त्वकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे. तर बापट यांच्या मतदार संघातून महापौर मुक्ती टिळक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.