वाशिम : अधिकार्यांनी जप्त केलेला रेती माफियांचा ट्रक तहसील कार्यालयातून पळवून नेऊन, तो अडविण्याचा प्रयत्न करणार्या नायब तहसीलदारास ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न करण्याची सिनेस्टाईल, थरारक घटना गुरूवारी रात्री वाशिममध्ये घडली. या हल्ल्यात नायब तहसीलदार जखमी झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गुरूवारी दुपारी एमएच २९ - ७११३ क्रमांकाचा ट्रक अवैध रेती घेवून जाणारा ट्रक तहसिलदारांनी जप्त करून तहसिल कार्यालय परिसरात उभा केला होता; मात्र रात्र झाल्यांनतर रेती तस्कराने हा ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नायब तहसिलदार राहूल वानखडे यांना हा प्रकार समजताच, त्यांनी त्या ट्रकचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. काटा मार्गावर असलेल्या पॉवर स्टेशनजवळ वानखडे यांनी त्यांची जीप ट्रकसमोर उभी करून, ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालक सोनू राजेश धोत्रे आणि मालक सचिन सुभाष श्रीनिवार यांनी वानखडे यांच्या अंगावर ट्रक नेवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून वानखडे कसेबसे वाचले. त्यानंतर सचिन श्रीनिवार आणि सोनू लगेच फरार झाले. क्लिनर सुभाष अजाबराव पठारे याला अटक करण्यात आली आहे. राहूल वानखडे यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नायब तहसिलदारास ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न!
By admin | Published: February 05, 2016 2:24 AM