मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर होत असलेल्या विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) पथक मुंबई बँकेच्या कारभाराची झाडाझडती घेण्यासाठी सोमवारी बँकेत दाखल झाल्याची चर्चा राजकीय व सहकार क्षेत्रात चांगलीच रंगली होती. मात्र दरवर्षी होणाºया नियमित निरीक्षणासाठी हे पथक आल्याची माहिती देत नाबार्डच्या एका अधिकाºयाने मुंबई बँकेवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना ‘क्लीन चिट’ दिली आहे.नियमबाह्य कर्जवाटप व पुरातन वास्तूमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे गंभीर आरोप बँकेवर सध्या होत आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी नाबार्डचे पथक बँकेत धडकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र ३ हजार कोटींहून कमी उलाढाल असलेल्या बँकेचे निरीक्षण दर दोन वर्षांतून, तर ३ हजार कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या बँकेचे निरीक्षण दरवर्षी नाबार्ड करत असते. मुंबई बँकेची उलाढाल ३ हजार कोटींहून अधिक असल्याने दरवर्षीप्रमाणे १५ दिवस निरीक्षणाची कार्यवाही करणार असल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. सर्वच सहकारी बँकांचे अशा प्रकारे नियमित निरीक्षण करत असल्याचेही संबंधित अधिकाºयाने स्पष्ट केले.केवळ राजकीय स्वार्थापोटी बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याची प्रतिक्रिया मुंबई बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी ‘लोकमत‘शी बोलताना दिली. दरेकर म्हणाले, नाबार्ड, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि सहकार विभागाच्या नियमानुसार बँकेने सर्व कर्जांचे वाटप केलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी ३३.५० टक्क्यांवर असणारा बँकेचा सीडी रेशो आज कॉर्पोरेट क्षेत्रात दिलेल्या कर्जामुळे ४३.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. बँक नफ्यात चालली आहे. शिवाय संचालक मंडळाच्या बैठकीत कोणताही आरोप होत नसताना, राजकीय उद्देशाने बँकेवर बिनबुडाचे आरोप होत आहेत. नातेवाइकांना नोकरी दिल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला. वास्तविक बँकेने अद्याप कायमस्वरूपी नोकरभरतीच केलेली नाही, त्यामुळे हा आरोपही बिनबुडाचा ठरतो. मुंबई बँकेची इमारत पुरातन वास्तूमध्ये येते. त्यामुळे पुरातन विभाग व महापालिकेकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्याशिवाय कोणतेही काम केलेले नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.१५ दिवस नियमित निरीक्षण-मुंबई बँकेची तपासणी ही कोणत्याही आरोपांवरून होत नसल्याचे नाबार्डच्या एका अधिकाºयाने सांगितले. दरवर्षी सहकार क्षेत्रातील सर्वच बँकांची अशा प्रकारे तपासणी केली जाते. पुढील १५ दिवस ती सुरूच राहील. तूर्तास तरी मुंबई बँकेने केलेल्या व्यवसाय विस्ताराचे नाबार्ड अधिकाºयांच्या बैठकीत कौतुक झाल्याचेही संबंधित अधिकाºयाने स्पष्ट केले.
नाबार्डची मुंबई बँकेला ‘क्लीन चिट’! नियमित निरीक्षणासाठी पथक सोमवारी बँकेत आल्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:18 AM