पुणे : महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शासनाकडून अनेकवेळा देण्यात आला. मात्र तरीही अद्याप पुणे विभागातील ३०० विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले नसल्याचे उजेडात आले आहे. केवळ २० महाविद्यालयांनी आतापर्यंत नॅक मूल्यांकन केले आहे.राज्य शासनाने १० आॅक्टोबर २०१० रोजी परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे बंधनकारक केले आहे. अनुदानित महाविद्यालयांनी मात्र नियमानुसार नॅक मूल्यांकन केले आहे. पुणे विभागात (पुणे, नगर, नाशिक) एकूण १६७ अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १६३ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत, केवळ ४ अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेले नाही. त्यामध्ये पुण्यातील १, तर नाशिकमधील ३ महाविद्यालयांचा समावेश आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एकूण ३१७ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर विद्यापीठाची संलग्नता रद्द करण्याची कारवाईची नमूद आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत उच्च शिक्षण सहसंचालक व पुणे विद्यापीठाकडून वारंवार सूचना देऊनही ही महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले नाहीत.विनाअनुदानित तत्वावरील महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन करून घेण्याची प्राथमिक जबाबदारी विद्यापीठाची सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाकडून याबाबत कार्यवाही न झाल्यास त्याची विचारणा करण्याची जबाबदारी अंतिमत: संचालकांवरच असणार आहे.>विनाअनुदानित महाविद्यालये चालविण्यासाठी सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या परिस्थितीत नॅक मूल्यांकन करणे अवघड असल्याचे महाविद्यालयाच्या संस्थाचालकांकडून सांगितले जात आहे. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत शासनाने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
नॅक मूल्यांकन रखडलेलेच, शासन आदेश कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:34 AM