ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.22 : नॅशनल अॅसेसमेंट अॅण्ड अक्रिडिटेशन कौंसिल (नॅक )तर्फे बुधवारी मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस ग्रेड मिळाला आहे. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ग्रेड घेवून पुणे विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले असून विद्यापीठाचा क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अॅव्हरेज (सीजीपीए) 3.60 आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नॅक समितीने भेट दिली होती. विद्यापीठाच्या विद्यार्थी,अधिकारी व कर्मचा-यांनी नॅकसाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे विद्यापीठाला कोणता ग्रेड मिळणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली होती. अखेर बुधवारी सायंकाळी नॅकच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील महाविद्यालयांच्या मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या मुल्यांकनाचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे बीड,जळगाव, परभणी, मुंबई,रत्नागिरी आदी ठिकाणच्या महाविद्यालयांचे मुल्यांकनाचे निकालही जाहीर झाले आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे म्हणाले, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी,अधिकारी व कर्मचा-यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विद्यापीठाला हे यश मिळाले आहे.विद्यापीठाचा यापूर्वीचा सीजीपीए 3.1 होता. त्यात वाढ होऊन तो 3.60 पर्यंत गेला आहे. विद्यापीठाचा पाया भक्कम झाला असून विद्यापीठाला अधिक पुढे जाता येईल. नॅककडून मिळालेल्या ग्रेडमुळे आनंद होत आहे.विद्यापीठाचे माजी बीसीयुडी डॉ.व्ही.गायकवाड म्हणाले, राज्यात सर्वाधिक ग्रेड घेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल क्रमांकावर आले आहे. अध्ययन ,अध्यापन आणि संशोधनामध्ये विद्यापीठाने मोठी कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या नवनवीन उपक्रमांची ,परदेशी विद्यापीठ व औद्योकीक कंपन्यांशी असलेल्या करारांची दखल घेतली.त्यामुळे विद्यापीठाचा 3.60 सीजीपीएवर आला आहे.