मुंबई : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी लोक सहकुटुंब रांगेत उभे असल्याचे चित्र होते. पैशांच्या चणचणीमुळे लोक हातचे राखून खर्च करत असल्याने त्याची बाजारावरही छाया पडली आहे. रविवारी मुंबईत खरेदीसाठी झुंबड उडते, मात्र नोटांच्या त्रासामुळे बाजारात विशेष गर्दी नव्हती. उपनगरांतही लोक रांगेत उभे होते. धुळ्यात पोलिसाला धक्काबुक्की नोटा बदलण्यासाठी स्टेट बँकेसमोर गर्दी झाल्यावर रांगेत उभे रहा, असे सांगितल्याचा राग आलेल्या शिंदखेडा (धुळे ) येथे एकाने पोलीस कॉन्स्टेबल ललित काळे यांना धक्काबुक्की केली. मात्र धक्काबुक्की करणारा पळून गेला. जळगावला सराफ बाजार ठप्प-सुवर्णनगरी जळगावातील सराफ बाजार रविवारी थंडावला होता. त्यामुळे ९५ टक्के उलाढाल ठप्प झाली आहे. आर.एल.ज्वेलर्स व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्ससह काही मोजकी दुकाने सुरू होती. रविवारी सराफ बाजारात १० ग्रॅमसाठी ३० हजार ५०० रुपयांचा भाव होता. तर चांदी ४६ हजार रुपये किलो होती.
लोणंदचा कांदा बाजार बंद!शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने लोणंद (सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन सोमवार व गुरुवारी कांदा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
वर्धा जिल्ह्यात ‘दारूबंदी’-नोटाबंदीमुळे वर्धा जिल्ह्यात आपोआपच दारूबंदीची अंमलबजावणी झाली आहे. अवैध दारूविक्रीला पैशांच्या तुटवड्यामुळे चाप बसला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)