अतुल कुलकर्णीमुंबई : ‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला. मंत्रिमंडळ बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आम्हाला न विचारता परस्पर दिल्लीत करार कसे करता, असे चढ्या आवाजात विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या उद्योगपतींची बैठक राजभवनात घेतली, त्याचे निमंत्रणही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना न पाठविल्याचे पडसादही मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.
नाणार येथे ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी अरबस्तानच्या कंपन्यांशी ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. त्यानंतर, हा प्रकल्प केल्यास राजीनामा देऊ, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. शिवसेनेच्या नाराजीनंतर दिल्लीतून, गुरुवारी मातोश्रीवर भेटीला येतो, असा निरोप धर्मेंद्र प्रधान यांनी पाठविला. मात्र, करार रद्द करून आल्यासच तुमचे स्वागत करू, असेही ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी ‘नाणार’वरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जे विषय मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसतील, तर आम्हाला तरी कसे कळतील? मुख्यमंत्र्यांनी मात्र अशी काही चर्चाच झाली नाही, असे सांगितले.
काय आहे नेमका हा प्रकल्प?इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागीदारीतून आरआपीसीएल या प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे. या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल. पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादने तयार होतील व मोठ्या प्रकल्पांसाठी कच्चा मालही पुरविण्यात येईल.नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडली तर खासदारकीचा राजीनामा फेकून देऊ, अशा शब्दांत भाजपाचे खा. नारायण राणे यांनी घरचा अहेर दिला. शिवसेना नेत्यांत राजीनामा देण्याची धमक नाही, आपल्यात ती आहे, असेही राणे म्हणाले.