फहीम देशमुख शेगाव, दि. २७- इतर तालुक्यातील शेतकर्यांनी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन केल्यानंतर मंगळवारी अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांनी शेगावच्या समिती यार्डावर सकाळी गोंधळ घातला. यावेळी यार्डासमोरील राज्य मार्ग काही काळ बंद केल्यानंतर समितीच्यावतीने या शेतकर्यांचा माल स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली.शासनाकडून तुरीला ५ हजार ५0 रुपये क्विंटल भाव देण्यात येत आहे; मात्र खरेदी केंद्रांवर गर्दी होत असल्याने जेथे लवकर नंबर लागतो. अशा ठिकाणी तूर विक्रीस आणली जात आहे. येथील केंद्रावरही जिल्ह्यासह परिसरातील शेतकर्यांनी तूर विक्रीसाठी गर्दी केलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यासह नजीकच्या अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांनीही या ठिकाणी तूर विक्रीसाठी आणली आहे. नाफेड १५ मार्चपयर्ंत तूर खरेदी करणार आहे; मात्र बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढल्याने बाजार समित्यांवर ताण वाढलेला आहे. तालुक्यातील शेतकरी वगळता इतर शेतकर्यांनी केंद्रावर तूर आणू नये, असा निर्णय घेण्यात आला. केंद्रासमोर ६00 वाहने नाफेड केंद्रावर तूर खरेदीची शासनाने १५ मार्च ही मुदत दिलेली असल्याने शेतकर्यांनी केंद्रावर आपली तूर विक्रीसाठी एकाच गर्दी केली आहे. शेगाव बाजार समितीत तुरीची विक्रमी आवक झाल्याने १५ फेब्रुवारीपासून केंद्रावर नवीन आवक बंद केली होती. यानंतर सोमवारपासून खरेदी सुरु करण्याच्या सूचना समितीच्यावतीने देण्यात आल्यानंतर रविवारी रात्रीपासूनच खामगाव रोडवरील स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डासमोर तुरीने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. या रांगा अकोट रोडवरील विश्राम भवनापयर्ंत तर बाळापूर रोडवर मुरारका विद्यालयापयर्ंत पोहोचल्या, याशिवाय एमएसईबी चौक ते स्वामी विवेकानंद चौकापयर्ंत रांगा गेल्याने शहरात दुपारपयर्ंत वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहरातील वाहतूक शाखेवर वाहतूक सुरळीत करण्याचा ताण होता.'त्या' कर्मचार्यावर कारवाई नाही शेगाव येथील केंद्रावर सध्या बरीच गर्दी झालेली असून, या केंद्रावर शेतकर्यांचा नव्हे, तर व्यापार्यांचा माल प्राधान्याने मोजला जात आहे. केंद्रावर आलेल्या शेतकर्यांनी नाफेड आणि बाजार समितीच्या कर्मचार्यांकडून होणारा दुजाभाव पाहून मागील आठवड्यात आवाज उठविला होता. यावेळीही व्यापार्यांच्या मालाची खरेदी बंद पाडत शेतकर्यांनी कर्मचार्यांना धारेवर धरले. यानंतर या प्रकरणात चौकशीअंती खरेदी-विक्री कर्मचार्याच्या इशार्यावरून सदर प्रकार होत असल्याचे निष्पन्न झाल्यावरून एका कर्मचार्यासह बाजार समितीच्या एका हमालाविरुद्ध समितीने नोटिस बजावल्या होत्या; मात्र या दोघांविरोधात अद्यापपयर्ंत कुठलीच कारवाई झाली नसल्याचे समजते. इतर तालुक्यातील शेतकर्यांनी या केंद्रावर माल आणू नये, असा निर्णय शासनाचा नव्हे, तर सभापती- उपसभापती यांनी घेतला होता. या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले. हा निर्णय मागे घेत सर्वांचा माल केंद्रावर सध्या स्वीकारल्या जात आहे.- विलास पुंडकर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव
जागा कमी असल्याने इतर तालुक्यातील शेतकर्यांनी आप-आपल्या तालुक्यातील केंद्रावर तूर विक्रीसाठी न्यावी, असा निर्णय शेगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी घेण्यात आला होता. आता नाइलाजास्तव माटरगाव केंद्रावर बाहेरील शेतकर्यांना पाठवावे लागणार आहे.- गोविंद मिरगे, सभापती, बाजार समिती शेगाव