मनीषा म्हात्रे,
मुंबई-नागपाड्यातून चार दिवसांत चार मुले बेपत्ता झाली आहेत. एक १३ वर्षीय मुलगा, त्यापाठोपाठ आणखीन तीन अल्पवयीन मुले नागपाडा नयानगर परिसरातून बेपत्ता झाली आहेत. तीन मुलांचे रस्ता ओलांडताना टॅक्सीतून अपरहण झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून वर्तविण्यात येत आहे. नागपाडा येथील नयानगर परिसरात राहणारा १३ वर्षीय इम्तियाज नियाज नद्दाफ २१ एप्रिल रोजी गायब झाला. भायखळा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. याचा तपास सुरु असताना २४ एप्रिल रोजी घराबाहेर खेळत असलेल्या दोन ६ वर्षीय मुलीसोबत ४ वर्षांचा मुलगाही अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. त्यामध्ये दोन भावंडाचा समावेश आहे. कुलसूम जुबेर खान (६), तरन्नुम कासुल (६) आणि गुलफाम कासुल (४) असे यामध्ये बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. नागपाडा पोलीस तपास करत आहेत. तरुन्नुम आपली दोन भावंडे कुलसुम आणि नगमासोबत व्हायएमसी मैदानातून परतत असताना नगमा रस्ता ओलांडून पुढे आली. तिघांना पाहण्यासाठी मागे वळलेल्या नगमाला तिघेही एका टॅक्सीआड गायब झाल्याचे दिसल्याचे तरन्नुमची आई रुक्सानाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तपास सुरु असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी कदम यांनी दिली. >लघुशंकेसाठी गेला तो आलाच नाहीइम्तियाज हा आई वडील आणि ३ भावंडासोबत नयानगरमध्ये राहतो. गेल्या महिन्याभरापासून मस्जिदचे इमाम यांच्याकडे उर्दू भाषेचे शिक्षण घेत होता. २१ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास लघुशंकेसाठी जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला तो परतलाच नाही. त्यानंतर आठवडा उलटत आला तरी थांगपत्ता लागलेला नाही. >आठ महिन्यांपूर्वीच मुंबईत आले...मुळचे उत्तरप्रदेश येथील असलेले खासुल कुटुंबिय आठ महिन्यापूर्वीच मुंबईत आले होते. नयानगर येथे ते भाड्याच्या खोलीत राहतात. तरन्नुम आणि गुलफाम दोघेही भावंडे असून तरन्नुम पहिली इयत्तेचे तर गुरफान सीनियर केजीचे शिक्षण घेतो. >तुम घर जाओ हम आते है....कुलसुमचा ४ वर्षीय भाऊ अकबरअलीही तिच्या मागे लागला होता. तेव्हा ‘तुम घर जाओ हम आते है...’ सांगून घरी पाठवल्याची माहिती कुलसुमच्या आईने दिली.