मुंबई : राज्यात ६ नगरपंचायतींसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक २१ जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदरात प्रत्येकी २० जागा पडल्या आहेत. राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत. माढा येथे सत्तांतर झाले असून, भाजपा पुरस्कृत साठे आघाडीला ११ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे.कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे काँग्रेसने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लोणंदमधील (जि. सातारा) निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ८ जागा जिंकल्या असून, त्याखालोखाल काँग्रेसने ६ जागा घेतल्या आहेत. मोहोळ आणि लोहारा बु. (उस्मानाबाद) येथे अनुक्रमे ६ आणि ८ जागा जिंकून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. लोणंदमध्ये राष्ट्रवादी लोणंद नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी राष्ट्रवादीला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या असून, त्यापाठोपाठ काँग्रेसला ६, तर भाजपाला २ जागांवर समाधान मानावे लागले. एक अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने सत्तेची चावी त्याच्याच हाती राहणार आहे. सत्ता स्थापन्यासाठी अपक्ष उमेदवार सचिन शेळके यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे, अशी चर्चा होती. परंतु, ‘कोणाला पाठिंबा द्यायचा, हे मतदारांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती शेळके यांनी दिली.राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील यांचा तब्बल १३६ मतांनी पराभव झाला, तर काँग्रेसचे नेते अॅड. बाळासाहेब बागवान यांचा ११ मतांनी पराभव झाला. शिवसेनेने ९ प्रभागांत उमेदवार उभे केले होते. त्यांच्या सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. लोहारामध्ये सेनेचा भगवा लोहारा नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने १७पैकी ९ जागा जिंकून भगवा फडकाविला़ या निवडणुकीत सेनेला ९, काँग्रेसला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला़ विजयी उमेदवारांत शिवसेनेचे पौर्णिमा लांडगे, निर्मला स्वामी, प्रताप घोडके, कमल भरारे, अभिमान खराडे, श्यामसुंदर नारायणकर, सुनीता ढगे, ज्योती मुळे, शिवसेना पुरस्कृत अबुववफा कादरी यांचा समावेश आहे़ तर काँग्रेसचे सीमा लोखंडे, श्रीनिवास फुलसुंदर, आरीफ खानापुरे हे तीन उमेदवार विजयी झाले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे आरती गिरी, जयश्री वाघमारे, नाजमिन शेख, गगन माळवदकर हे चार उमेदवार विजयी झाले़सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौलमाढा, माळशिरस आणि मोहोळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला असून, माढ्यामध्ये सत्तांतर झाले आहे; तर माळशिरस आणि मोहोळमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-सेनेला मतदारांनी रोखले आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ३ जागांवर विजय मिळविणाऱ्या रमेश बारसकरांनी या वेळी मतदारांवर प्रभाव पाडल्याचे दिसून आले. अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला ४ जागांवर समाधान मानावे लागले. माढ्यात सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे दिसते आहे. विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यातील ही लढाई धनाजी साठे यांनी जिंकली आणि भाजपा पुरस्कृत साठे आघाडीला ११ जागा मिळवून दिल्या. माळशिरसमध्ये कुठल्याही आघाडीला आणि गटाला बहुमत मिळाले नसून संजीवनी पाटील, माणिक वाघमोडे, मिलिंद कुलकर्णी, विष्णू केमकर या ४ माजी सरपंचांना नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नगरपंचायतीत काँग्रेसची बाजी
By admin | Published: April 19, 2016 4:23 AM