Nagar Panchayat Election Result 2022: आघाडीतील बिघाडी भाजपच्या पथ्यावर! नगरपंचायतीत काँग्रेसला फटका; १०० जागा घटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:13 AM2022-01-21T11:13:57+5:302022-01-21T11:20:41+5:30
Nagar Panchayat Election Result 2022: काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेनेने पटकावल्या
- अतुल कुलकर्णी
मुंबई : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. मागील जागांच्या तुलनेत काँग्रेसच्या १०० जागा घटल्याचे अंतिम निकालात स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेनेने पटकावल्या आहेत.
राज्यात यावर्षी पाली, देहू, महाळूंग-श्रीपूर, वैराग, नातेपुते आणि तीर्थपुरी अशा सहा नगरपंचायत नव्याने निर्माण करण्यात आल्या. त्या ठिकाणी प्रथमच मतदान झाले. राहिलेल्या १०० नगरपंचायत जुन्याच होत्या. २०१४ ते २०१६ मध्ये तेथे निवडणुका झाल्या होत्या. यापूर्वीचे संख्याबळ बघितल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी ज्या काळात सत्तेत नव्हती त्यावेळी त्यांना यश मिळाले होते. मात्र आता सत्ता मिळूनही काँग्रेसला मागच्या जागा टिकवता आल्या नाहीत.
काँग्रेसने स्वबळाची भाषा सुरुवातीपासून लावून धरली होती. निकालानंतरही माजी प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याचे समर्थनच केले. आज जरी आमचे नुकसान झाले असले तरी भविष्यात त्याचा राजकीय फायदाच होईल, असेही ते म्हणाले. मात्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले यांनी सतत केलेली वादग्रस्त विधाने पक्षालाच अडचणीची ठरली. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती आणि नाही. जबाबदारी घेण्याची तयारीही नाही. काँग्रेसचा एक मोठा वर्ग ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या विचाराचा होता. पण स्वबळाच्या सततच्या घोषणा आणि त्यावरून आघाडीत होणारी नाराजी यामुळे तोही वर्ग फारसा सक्रिय झाला नाही.
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांनी आपापले जिल्हे सांभाळले. त्यामुळे काँग्रेसची पडझड थांबवण्यास मदत झाली. अन्यथा काँग्रेसला आणखी मोठा फटका बसला असता. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नव्हती तशीच स्थिती महाविकास आघाडीमध्येही होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तो काही कारणाने मान्य होऊ शकला नाही, असे स्वत: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. पण आघाडी का झाली नाही हे त्यांनी सोयीस्कररीत्या सांगण्याचे टाळले. याच बिघाडीचा फायदा भाजपने उचलला. गेल्या वेळेच्या तुलनेत तब्बल ७४ जागा जास्तीच्या मिळवल्या.
शिवसेनेच्या मदतीला उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आली. शिवसेनेत जरी सुंदोपसुंदी असली तरी ती बाहेर आली नाही. त्याचा फायदा शिवसेनेला तब्बल ९४ जागा जास्तीच्या मिळवता आल्या. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्याचाही फायदा सेनेला झाला. पण तिघांनी एकत्रित निवडणूक लढविली असती तर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी चांगले वातावरण तयार झाले असते. भाजपच्याही जागा कमी करता आल्या असत्या. पण ही संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घालवली.
पक्ष २०१४-१६ २०२१ (-/+)
काँग्रेस ४४५ ३४४ - १००
भाजप ३४५ ४१९ +७४
राष्ट्रवादी ३३६ ३८१ +४५
शिवसेना २०४ २९६ +९२
इतर ३७२ ३५१ - २१