Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं १२, काँग्रेसनं ३ तर भाजपनं केवळ २ जागांवर विजय मिळवला.
ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे १३ जागांवर २२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर उर्वरित ४ जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आलं. तर दुसरीकडे यापूर्वीच्या १३ जागांपैकी एका जागेवर भाजपच्या एका उमेदवारानं अखेरच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे ती जागा बिनविरोध झाली होती. तर भाजपच्या एका उमेदवारानं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिला होता. त्यामुळे ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. परंतु अखेर या निवडणुकीत रोहित पवारांनी बाजी मारली आणि या नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली.