Nagar Panchayat Election Result: “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:08 PM2022-01-19T16:08:49+5:302022-01-19T16:09:28+5:30
भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत
मुंबई – राज्यातील नगर पंचायतीच्या निकालाचे चित्र आता बहुतांश स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीने भाजपाचा धुव्वा उडवला आहे. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपा या चारही पक्षांची कामगिरी पाहिली तर राज्यात भाजपा नंबर एक पक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षा २०२२ मध्ये भाजपाने जास्त जागा जिंकल्याची आकडेवारी समोर आली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, २०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल पाहता राज्यात भाजपा क्रमांक १ चा पक्ष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपाध्ये यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणूक निकालाचे आकडे पोस्ट केले आहेत.
त्यात भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेने २०१७ मध्ये २०१ जागा जिंकल्या होत्या. त्यातही वाढ होऊन हा आकडा २९० इतका झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१७ च्या निवडणुकीत ३३० जागा जिंकल्या होत्या त्यांना यंदाच्या निकालात ३६९ जागा मिळाल्या आहेत. यात मागील निवडणुकीच्या निकालाची तुलना केल्यास काँग्रेसला जबर फटका बसल्याचं दिसून येते. काँग्रेसला २०१७ च्या निकालात ४२६ जागा मिळाल्या होत्या तो आकडा २९९ पर्यंत खाली घसरला आहे.
२०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल. भाजपाचं क्रमांक १.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 19, 2022
शिवसेना, राष्ट्रवादी, कॅाग्रेस हे
तीन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपा सोबतच. pic.twitter.com/TK4tzR2TZL
राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना टोला
राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे त्यामुळे हा पक्ष दोन-तीन जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं बोलणाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चपराक लगावली आहे अशा शब्दात NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे असं त्यांनी म्हटलं.