Nagar Panchayat Election Results: अवघ्या २ मतांनी नशीब उजळले; राष्ट्रवादीच्या उमेदवार 'नगरसेविका' बनल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:28 PM2022-01-20T16:28:17+5:302022-01-20T16:28:44+5:30
केज नगरपंचायतीत मागील दहा वर्षे मतदारांना विकासापासून दूर ठेवणाऱ्या काँगेसला या निवडणुकीत मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले
केज : नगर पंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राज्यात विजयी उमेदवारांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक नगरपंचायती जिंकून वर्चस्व बनवलं आहे. तर राज्यात सर्वाधिक जागा जिंकून भाजपानेही स्वत:ची ताकद दाखवून दिली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक किस्से घडल्याचं पाहायला मिळालं. जनतेने साथ दिली पण ईश्वर चिठ्ठीनं घात केला असंही पाहायला मिळालं आहे. त्यात अवघ्या २ मतांनी नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान एका महिलेला मिळाला आहे.
केज नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करीत जनविकास परिवर्तन आघाडीने धक्का दिला. खासदार रजनी पाटील व अशोक पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जनविकास आघाडीचे नेते हारुन इनामदार हे पराभूत झाले. तर बजरंग सोनवणे यांची मुलगी पराभूत झाली. भाजप नेते रमेश आडसकर, हारुन इनामदार, अंकुश इंगळे यांनी जनविकास आघाडी करून निवडणूक लढविली होती. यात त्यांना यश आले.
अवघ्या दोन मतांनी विजय
केज नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोजरबाई शिवाजी गाढवे यांना २९४ मते मिळाली. तर काँग्रेस आयच्या प्रतिस्पर्धी उमेदवार विद्या अशोकराव पाटील यांना २९२ मते मिळाली. अवघ्या दोन मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोजरबाई गाढवे विजयी झाल्या.
केज नगरपंचायतीत मागील दहा वर्षे मतदारांना विकासापासून दूर ठेवणाऱ्या काँगेसला या निवडणुकीत मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले. काँगेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या गटाने पाच जागा जिंकण्यात यश मिळविले असले तरी मुलगी डॉ. हर्षदा सोनवणे हिच्या पराभवाचा सामना त्यांना करावा लागला आहे. हारुन इनामदार, रमेश आडसकर, अंकुश इंगळे यांनी एकत्र येऊन जनविकास परिवर्तन आघाडी स्थापन करीत केज नगरपंचायतीची निवडणूक लढवली होती. मतदारांनी जनविकास परिवर्तन आघाडीच्या बाजूने मतांचा कौल दिल्याने आघाडीने ८ जागांवर विजय मिळविला. मात्र आघाडीचे हारुन इनामदार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येेथे एका जागेवर विजय मिळवत खाते उघडले. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.
पक्षीय बलाबल
जनविकास आघाडी - ८
काँग्रेस - ३
राष्ट्रवादी काँग्रेस - ५
स्वाभिमानी शेतकरी संघटना - १
बजरंग सोनवणे यांच्या कन्येचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या व प्रभाग क्रमांक २ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेवार हर्षदा बजरंग सोनवणे यांना ५८८ मते मिळाली तर जनविकास परिवर्तन आघाडीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आशाबाई सुग्रीव कराड यांना ६०५ मते मिळाल्याने हर्षदा सोनवणे यांचा केवळ १७ मतांच्या फरकाने पराभव झाला.
विजयी उमेदवार असे-
प्रभाग १ - अझारोद्दीन बशिरोद्दीन शेख (राष्ट्रवादी)
प्रभाग २ - आशाबाई सुग्रीव कराड (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग ३ - आदित्य अशोकराव पाटील (काँग्रेस)
प्रभाग ४ - शकुंतला सज्जन अंधारे (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग ५ - सोजरबाई शिवाजी गाढवे (राष्ट्रवादी)
प्रभाग ६ - बालासाहेब दत्तात्रय जाधव (राष्ट्रवादी)
प्रभाग ७ - सीता प्रदीप बनसोड (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग ८ - आलिया बेगम हारून इनामदार (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग ९ - पद्मिण गुलाब शिंदे (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग १० - रेश्मा जलालोद्दीन इनामदार (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग ११ - तरमिमबेगम गजमफर इनामदार (जनविकास परिवर्तन आघाडी)
प्रभाग १२ - सोमनाथ बाळासाहेब गुंड (काँग्रेस)
प्रभाग १३ - शीतल पशुपतीनाथ दांगट (काँग्रेस)
प्रभाग १४ - तसलीम युनुस शेख (राष्ट्रवादी)
प्रभाग १५ - रामचंद्र विठ्ठलराव गुंड (राष्ट्रवादी)
प्रभाग १६ - पल्लवी ओमप्रकाश रांजणकर (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
प्रभाग १७ - जकीयोद्दीन महेबूबमिया इनामदार (जनविकास परिवर्तन आघाडी)