- मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
पहिला सहकारी व खासगी सहकारी साखर कारखाना सुरू करून महाराष्ट्रातच नाही तर भारतात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे साखर साम्राज्य काळाच्या ओघात खालसा झाले आहे. देशातील साखरेचे आगार म्हणून असलेली अहमदनगरची ओळख पुसून दुष्काळी म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता साखर कारखानदारीची नवी पंढरी बनला आहे. सोलापूरच्या ३४ खासगी कारखान्यांच्या धडाक्यामुळे २२ साखर कारखान्यांच्या अहमदनगर जिल्ह्याची साखर कारखानदारीत पिछेहाट झाली आहे. दिवंगत धनंजयराव गाडगीळ, वैकुंभाई मेहता, पद्मश्री विठ्ठलराव विखे व माजी केंद्रिय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे आदींच्या प्रयत्नातून प्रवरानगरमध्ये भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला. त्याहीपूर्वी श्रीरामपूरजवळच्या हरेगावात ब्रॅडी कंपनीने देशातील पहिला खासगी साखर कारखाना सुरू केला.आतापर्यंत सर्वाधिक साखर कारखान्यांमुळे नगरला साखरेचे आगार म्हटले जात होते. नंतर साईकृपाच्या रुपाने सहकाराच्या बरोबरीने खासगी साखर कारखानेही नगरमध्ये पुन्हा सुरू झाले. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माहितीनुसार १९५०-५१ मध्ये देशात १४३ साखर कारखाने होते. आता २०१४-१५ मध्ये ही संख्या ५३८ वर पोहोचली आहे. त्यातील निम्मे राज्यातील आहेत. २०१४-१५ मध्ये महाराष्ट्रात १७८ सहकारी कारखाने होते. २०१५ अखेरीस राज्यात १९८ कारखाने होते.