ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 05 - जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये होणा-या निवडणुकीसाठी सर्कल निहाय आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पार पडली. यात विद्यमान ७० टक्के सदस्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांचा सर्कल सर्वसाधरण प्रवर्गात आल्यामुळे त्यांचे पती टेकचंद सावरकर यांनी लढण्याची तयारी दर्शविली आहे. उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचे कन्हान पिंपरी हे सर्कल नगर पंचायत झाल्याने, त्यांना बाजूच्या मतदारसंघात धाव घ्यावी लागत आहे. विरोधीपक्ष नेते मनोहर कुंभारे यांचा मतदारसंघ अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांनी बाजुच्या ब्राह्मणी मतदार संघातून तयारी दर्शविली होती. परंतु हा सुद्धा सर्वसाधरण महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना घरीच बसावे लागणार आहे. माजी अध्यक्ष संध्या गोतमारे यांचा सर्कल ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांनाही इतर सर्कलचा शोध घ्यावा लागणार आहे. माजी उपाध्यक्ष यांचा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांचीही धावपळ होणार आहे. जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्या पत्नी, अरुणा मानकर यांचा सर्कल अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही घरी बसावे लागणार आहे.