नागपूर : रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणा-या स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे. राजकुमार पंडलिक ठोमळे (वय ५७, रा. चंदनशेष नगर) असे आरोपी लिपिकाचे नाव असून, नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मानकापूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील ओपीडीत ठोमळेची रुग्ण पंजीकरणासाठी नियुक्ती होती. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाची नोंदणी करण्यासाठी ४० रुपये शासकीय शुल्क आहे. मात्र, आरोपी ठोमळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून ८० रुपये घ्यायचा. त्याची पावती देण्यापूर्वी आरोपी कार्बन कॉपीवर ८० ऐवजी ४० रुपये नोंदवायचा. अशा प्रकारे त्याने रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासनासोबत तब्बल तीन वर्षे बनवाबनवी केली. त्याचप्रमाणे २६ डिसेंबर २०१४ ते १० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २९, ४७६ रुपयांची अफरातफर केली. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांनी ठोमळेला विचारणा केली असता तो असंबंद्ध माहिती देऊ लागला. तो गुन्हयाची कबुली देत नसल्यामुळे डॉ. प्रवीण निलकंठ नवघरे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून एएसआय एजाज शेख यांनी आरोपी ठोमळेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.