ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - संपूर्ण कर्जमाफीसह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी शेतक-यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रामटेकमध्ये मात्र बंदला हिंसक वळण मिळाले. येथे भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले. त्यांच्यातील वादामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यामुळे तनावाचे वातावरणही निर्माण झाले होते.
रामटेक शहरात भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाल्याने तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केल्याने पोलिसांना नाईलाजास्तव लाठीमार करावा लागला. लाठीमाराची ही रामटेक शहराच्या अलिकडच्या इतिहासातील ही पहिली वेळ होय.
शिवसेनेने शेतकरी आंदोलन आणि बंदला आधीच समर्थन जाहीर केले होते. रामटेक शहरात सकाळीपासून संपूर्ण बाजारपेठ बंदच होती. मात्र भाजपचे नगरसेवक आलोक मानकर यांनी त्यांचे हॉटेल सुरूच ठेवल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हॉटेल बंद करण्याची वारंवार विनंती केली. मानकर हॉटेल बंद करीत नसल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आत शिरून हॉटेलमधील साहित्य फेकायला सुरुवात केली. आलोक मानकर यांच्या सूचनेवरून भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करीत शिवसेनेचे माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केली. त्यातच भाजपच्या नगसेविका वनमाला चौरागडे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यात त्या खाली कोसळल्याने चेंगराचेगरीत जखमी
झाल्या. कार्यकर्ते महात्मा गांधी चौकात पोहोचताच उपविभागीय पोलीस अधिकारी लोहीत मतानी यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करीत बिकेंद्र महाजन यांना ताब्यात घेतले. परंतु, कुणीही ऐकायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या प्रकरणात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी नोंदविल्या.
यासोबतच शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, जय जवान जय किसान, विदर्भ राज्य आंदोलन समिती, शिवसेना आदींसह विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको व धरणे देत आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने तुकडोजी पुतळा परिसरात आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर भाजीपाला फेकून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. जय जवान जय किसान संघटनेतर्फे दिघोरी चौक व कळमना मार्केटसमोर आंदोलन करण्यात आले.