महाबळेश्वर (सातारा ) - नागपूर येथील हवाला प्रकरणातील सुमारे तीन कोटी रुपयांची चोरी करून महाबळेश्वरमध्ये एंजॉयसाठी आलेल्या चौघांच्या टोळीला सातारा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. याबाबतची अधिक माहिती अशी की विदर्भातील एका हवाला टोळीने नागपूरहून भंडाराकडे सुमारे तीन कोटी रुपयांची रोख रक्कम संबंधितांकडे पोहोचविण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र ही रक्कम व्यवस्थित पोहोच होण्यापूर्वीच काही मंडळींनी ही रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणाची कुणकुण लागताच नागपूर पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल ट्रॅकवरून ही मंडळी महाबळेश्वर परिसरात असल्याचा संशय व्यक्त केला. नागपूर पोलिसांनी सातारा पोलिस दलाला या घटनेची माहिती देताच पोलिस पथकाने महाबळेश्वर परिसरातील काही लॉजेसमध्ये चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासात महाबळेश्वरमधील सनी हॉटेलमध्ये चार तरुण संशयास्पदरीत्या मुक्कामाला असल्याचे स्पष्ट झाले. महाबळेश्वर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सनी हॉटेलमधील या संशयितांच्या रूममध्ये घुसून चौकशी सुरू केली. नागपूर हवालाकांडातील एवढी मोठी रक्कम या संशयितांनी नेमकी कुठे ठेवली, याचाही शोध पोलीस घेत आहेत
नागपूर हवालाकांडातील तीन कोटी रुपये महाबळेश्वरात !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 7:58 PM