नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष लोगोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी लोकमतच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बघता बघता नागपूर लोकमतने ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. दिवस कसे जातात कळत नाही. या पन्नास वर्षांच्या कालावधीत संस्थेने अनेक चढ-उतार पाहिले असतील. मोठा इतिहास पाहिला. सुवर्ण महोत्सवाचा हा नवीन लोगो देखील अतिशय उत्तम तयार केला आहे. हा लोगो लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेले लोकमतचे आणि आमचे नाते पुढील पन्नास वर्षेही असेच कायम राहील, याचा मला विश्वास आहे. लोकमत याच दिमाखात शंभर वर्ष पूर्ण करेल, त्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने माझ्या लोकमतला हार्दिक शुभेच्छा. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्रगेल्या ५० वर्षांत लोकशाही मजबूत होतानाचा कालखंड लोकमतने केवळ पाहिलाच नाही, तर त्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. म्हणूनच तो आज जनतेचा आवाज बनला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लाेकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांनी सुरु केलेले लोकमत आज महाराष्ट्र आणि गोव्याचा बुलंद आवाज बनले आहे. लोकमतने अन्य राज्यांतही जाण्यासाठी वेगळी माध्यमे निवडली पाहिजेत. समाजासाठी आणि सत्तेसाठी काम करणाऱ्यांमधील फरक ओळखून तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. लोकमत ते यशस्वीपणे करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल