नागपूर - नागपुरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. वातावरणही चांगले आहे. असे असतानाही मतदान कमी का झाले, मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर का पडले नाहीत, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी भेटीसाठी आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील जाहीर सभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाले. येथील राजभवनात त्यांनी मुक्काम केला. शनिवारी सकाळी भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आ. गिरीश व्यास आदींनी जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेत स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदी हे नागपूर विमानतळासाठी रवाना झाले. रामटेकमध्ये निवडणूक कशी राहिली, तेथे कुणाची जिंकण्याची शक्यता आहे याची माहितीदेखील त्यांनी जाणून घेतली. यानंतर ते नांदेडसाठी रवाना झाले.
नाष्ट्यामध्ये पोहे व थालीपीठपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाने राजभवनातील कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. पंतप्रधान मोदी यांनी रात्री साधे भोजन घेतले. त्यांच्यासाठी चवळीच्या शेंगांची भाजी तयार करण्यात आली होती. सकाळी नाष्ट्यामध्ये आलू पोहा व थालीपीठ घेतले.